Wednesday 30 October 2019

तो मी नव्हेच ..

"पुसणार  कुणी असेल अश्रू
तर डोळे भरून यायला अर्थ आहे, 
कुणाचे डोळे भरणार नसतील तर 
मरण सुद्धा  व्यर्थ आहे..."

किती सुंदर आहेत ना या ओळी, खऱ्या अर्थाने चारोळी! आठवतंय का कुणाच्या आहेत? अहो, वाचल्या असतील तर नक्की आठवतील. आम्ही कॉलेज मध्ये असतानाच्या काळात या खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. चंद्रशेखर गोखले हे त्या कवीचं नाव. त्यांचा तेव्हा " मी माझा" हा चारोळी संग्रह खूपच गाजला होता. जीवनातलं सार "शेर" सारखं चारोळीत मांडायची कल्पना या कवीला सुचली त्याला सलाम! 

आत्ता हे लिहिण्यास कारण की, मी जेव्हा या वाचल्या होत्या अर्थातच मलाही खूप आवडल्या होत्या आणि आजही लक्षात आहेत. पण एक प्रयत्न म्हणून तेव्हा मी या संग्रहातल्या काही चारोळींवर वात्रटिका लिहिण्याचा प्रयत्न केला होता. त्या आज मी तुमच्या समोर मांडू इच्छितो. आशा करतो की तुम्हाला आवडतील, माझ्या नाही आवडल्या तर निदान मूळ चारोळी तरी वाचाल त्या निमित्ताने !  मूळ चारोळी "उद्गारवाचक" चिन्हात दिली आहे त्या खाली माझी वात्रटिका आहे. त्यांच्या संग्रहाचं नाव होतं "मी माझा", माझ्या संग्रहाचं नाव असेल तो मी नव्हेच ..

१. 
"इथे प्रत्येकजण आपापल्या घरात
अन प्रत्येकाचं दार बंद आहे,
तरी एकोप्यावर बोलणं हा
प्रत्येकाचा छंद आहे..."
---
इथे प्रत्येकजण आपापल्या घरात
अन प्रत्येकाचं तोंड बंद आहे,
कारण व्हाट्सऍप आणि फेसबुक
प्रत्येकाच्या मोबाईल वर चालू आहे... 

२. 
"ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे
तरी मन तुझी वाट पहाणं सोडत नाही,
मीही म्हणतो जाऊ दे
मी त्याचं मन मोडत नाही..."
----
ठाऊक असतं तुझं मला स्वीकारणं अशक्य आहे,
कारण मी तुझ्या लायक नाही,
म्हणूनच म्हणतो - जाऊ दे
मी "त्या"चं तंगडं मोडत नाही...


३.
"तुझ्यावर रागावणं हा
तुला आठवण्याचा बहाणा आहे,
तू आलास की तो ही जातो
तसा माझा राग शहाणा आहे..."
----
तुला टाळणं हा तुलाच 
वाचवण्याचा एक बहाणा आहे,
कारण तू आलास की तो ही येतो
तसा माझा बाप शहाणा आहे...

४. 
"मला वाटलंच होतं मला पाहिल्यावर
तू मागे वळून पाहशील,
वळून पाहण्याइतकी तू
नक्कीच माझी राहशील..."
---
मला वाटलंच होतं मला पाहिल्यावर
तू मागे वळून येशील,
बस मध्ये काढलेल्या तिकिटाचे ५ रुपये
निर्दयपणे परत करशील...

५. 
"सगळीच वादळं मी 
खिडकीत बसून पाहिली,
पण परवाच्या वादळात
माझीच खिडकी वाहिली"
----
सगळ्यांची तावदानं
मी खेळताना फोडली,
पण परवाच्या खेळात
माझ्याच घरची फुटली...

६. 
"वाळकं पान गळताना सांगतं
वसंत आता येणार आहे,
तो ओरडतच येतो
मी आता जाणार आहे..."
---
पांढरा केस उगवताना सांगतो
म्हातारपण आता येणार आहे,
त्याला काळं केलं तर म्हणतो
अरे तुझा दात पण आता पडणार आहे...

७.
"पावसाचा एक थेंब चुकून
माझ्या खोलीत येऊन पडला,
आणि बाहेरचा पाऊस पाहून 
मुक्यानेच रडला.."
-----
पावसाचा एक थेंब चुकून
माझ्या खोलीत येऊन पडला,
पण त्यावरून पाय घसरून
शेजारचा बाळू पडला...

८. 
"घराभोवती कुंपण हवं
म्हणजे आपलं जग ठरवता येतं,
बाहेर बरबटलेलं असलं तरी
आपल्यापुरतं सारवता येतं..."
----
घराभोवती कुंपण हवं
म्हणजे आपलं जग ठरवता येतं,
कुंपण थोडं छोटं असलं तरी चालेल
कारण शेजारच्या घरात डोकावता येतं...

९. 
"माळरानावर पाखरं 
दाटीदाटीनं जमायची,
बुजगावणी मग वेडी
त्यांच्या संगतीत रमायची..."
----
माळरानावर पाखरं 
दाटीदाटीनं जमायची,
इतकी हुषार झालीयेत की
जाताना बुजगावण्यावर शिटायची...

१०.
"अडकलेला पतंग आधी 
काढायला निघतात,
निघत नाही म्हटल्यावर 
फाडायला निघतात..."
----
हरवलेली चप्पल आधी
शोधायला निघतात,
मिळत नाही कळलं की
दुसऱ्याची घालून जातात...

११.
'गावाच्या वेशीवर
मारुतीला बसवलेला,
दर शनिवारी नारळ देऊन
बिचाऱ्याला फसवलेला..."
----
शेजारच्या नाक्यावर 
स्टॉल टाकलेला,
महिन्याच्या हफत्यावर
कसाबसा टिकवलेला...

१२.
"सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला
एकदा पालवी फुटली,
त्यालाच कळेना ही 
जगायची जिद्द कुठली..."
-----
ओठावरच्या मोकळ्या जागेत
एकदाची पालवी फुटली,
तेव्हा मला कळलं की माझी 
बालपणीची हद्द संपली...

१३. 
"खूपदा माझा एकलेपणा
माझ्याशी बोलका होतो,
मग कुणी एक शब्द जरी बोलला
तर त्याचाही गलका होतो..."
-----
खूपदा माझा हावरेपणा 
मला खूप चेतावतो,
मग दुसऱ्या दिवशीच्या सकाळ नंतरच
मी थोडासा हलका होतो..

१४.
"काट्याला फक्त बोचणंच माहीत
त्यात त्याचा दोष नाही,
हे मी जाणलं म्हणूनच 
माझा तुझ्यावर रोष नाही.."
---
टाचणीला फक्त टोचणं माहीत
त्यात तिचा काही दोष नाही,
मला ती दिसली नाही त्यामुळे
आता चोळण्याशिवाय गत्यंतर नाही...

१५. 
"भर दुपारी सावली
झाडाखाली धावली"
---
भर रात्री चंद्र 
अंधाराला घाबरला,
आणि ढगांच्या मागे
लपून बसला....

१६.
"परवा एक पाखरू रानात
आपलं घरटं शोधत राहिलं,
कसं सांगू त्याला त्याचं
घरटं मी पडताना पाहिलं..."
----
परवा एक लेकरू बागेत
कुणाला तरी शोधताना मी पाहिलं,
कसं सांगू त्याला त्याचं पाखरू
मी दुसऱ्याबरोबर फिरताना दिसलं...

१७. 
"तुझं आवडणंही मला
किती सहन करावं लागतं,
उर भरून श्वास घेऊन  
पुन्हा गुदमरावं लागतं..."
---
तुझं आवडणंही मला
किती सहन करावं लागतं,
तुझी होते चंगळ पण मला माझं पाकीट 
सारखं रिकामं करावं लागतं..

१८.
"अळवाच्या पानावर कसं
पाणी स्वतःला सावरून बसतं,
मोत्यासारख्या दिसण्याच्या नादात
वहाणंच हरवून बसतं..."
-----
मंत्रिपदाच्या खुर्चीवर कसा
मंत्री स्वतःला सावरून बसतो,
खुर्ची टिकवण्याचा नादात
नेतेपण हरवून बसतो...

१९.
"इमारत बनायला वेळ लागत नाही
घर बनायला वेळ लागतो,
घरासाठी दोन जीवांचा 
खरा खुरा मेळ लागतो..."
----
इमारत बनायला वेळ लागत नाही
घर बनायला वेळ लागतो,
घरासाठी कमीत कमी 
वीस लाखांचा बॅलन्स लागतो...

आवडल्याच तर आपला अभिप्राय नक्की द्या, कारण  

वाचणार कुणी असेल तर 
ब्लॉग लिहायला अर्थ आहे,
आणि वाचून फॉरवर्ड करायला ही
 तसा तो वर्थ आहे.. 😉😃🙏

1 comment:

मन बावरे

तुम्ही "ती सध्या काय करते" हा चित्रपट पाहिला आहे का हो? असेलच आणि आवडला पण असेल. पण तुम्हाला माहिती की अशाच विषयावरचा "96...