Sunday 31 May 2020

मन बावरे


तुम्ही "ती सध्या काय करते" हा चित्रपट पाहिला आहे का हो? असेलच आणि आवडला पण असेल. पण तुम्हाला माहिती की अशाच विषयावरचा "96" नावाचा एक तामिळ चित्रपट पण आहे? नाही? काही दिवसांपूर्वी मला पण माहीत नव्हता. त्याचं झालं असं, युट्युब वर आपण व्हिडीओ बघतो त्यामध्ये आपल्याला ते युट्युब इतर व्हिडीओ पण सुचवत असतं. एकदा मला "लाईफ ऑफ राम" अशा एका गाण्याची लिंक आली. मला फोटोग्राफीची आवड असल्यामुळे हातात कॅमेरा घेतलेली एक व्यक्ती गाण्यात दिसली आणि उत्सुकता चाळवली गेली. ते गाणं मी बघितलं.  अप्रतिम छायाचित्रण आहे त्या गाण्याचं! एका फोटोग्राफरचं काम इतकं सुंदर टिपलंय त्या गाण्यात, "मला पण हे करायचंय, मी तिथे जाणार, मी पण असा फोटो काढणार" असं इतके वेळा होतं ते गाणं बघताना. खाली इंग्रजी अनुवाद येतो त्यामुळे भाषा कळली नाही तरी तसा फरक पडत नाही.  गाणं आवडलं म्हणून चित्रपटाविषयी जरा वाचलं आणि बघावासा वाटला. अनायासे हिंदीमधे अनुवाद केलेला उपलब्ध आहे युट्युब वर तो डाउनलोड केला आणि बघितला. 

इतका नितांत सुंदर चित्रपट आहे! खूपच छान! जरूर बघा.  खासकरून आजच्या काळात जिथे प्रेमाच्या कल्पना बदलत चालल्यात. वासनामय प्रेम काय, ऍसिडफेक काय, आत्महत्या काय, नैराश्य काय, प्रेम असं नसावं आणि नसतंच.   खरं प्रेम कसं असू शकतं आणि ते आपल्याला किती समजूतदार बनवू शकतं हे या चित्रपटात खूप छान मांडलं आहे. पण हिंदी अनुवादीत चित्रपटात सगळी गाणी छाटून टाकली आहेत कारण त्यांना गाण्याचं  भाषांतर जमलं नसावं. पण त्यामुळे  काही गाणी जी त्या चित्रपटाचा आत्मा आहेत ती नाहीयेत त्यात. असंच एक गाणं - "थाबंगले". 

खूप अप्रतिम गाणं आहे, कथेच्या दृष्टीने. शाळेत प्रेमात पडलेली दोघे जण इतक्या वर्षांनी परत भेटलेत, तिचं लग्न झालंय, त्याने केलं नाही, भेटल्यावर ती परदेशात परत चाललीये, परत कधी येणार माहीत नाही. दोघांच्याही मनात अजूनही एकमेकांविषयी ओढ आहे पण त्या दोघांनाही माहिती आहे की  त्यांचं एकत्र येणं शक्य नाही, त्यांना त्यांच्या आयुष्यात परत जाणं भाग आहे. तो तिला विमानतळावर सोडायला चाललाय आणि हे गाणं येतं.  अप्रतिम संगीत, सुंदर गायन, सहजसुंदर अभिनय आणि शहराचं अप्रतिम छायाचित्रण याचा सुंदर मिलाफ असलेलं हे गाणं आहे. तुम्ही जर चित्रपट आधी बघितलात आणि नंतर हे गाणं पाहिलंत तर हे गाणं आपल्याला त्यांच्यात अधिकच गुंतवून ठेवतं.  

आता मूळ मुद्दा... झालं काय तर हे गाणं माझ्या डोक्यात अडकलं पण भाषा तामिळ असल्यामुळे गुणगुणता येईना. तेव्हा विचार आला की हे आपण मराठीत रुपांतरीत केलं तर?  तसा प्रयत्न करत गेलो आणि सुचत गेलं. जे सुचलं ते गाण्याचं शब्दशः भाषांतर नाहीए पण चित्रपटाचं सार मात्र नक्की आहे त्यात.  तर मला सुचलेली ती कविता / गाणं इथे मांडत आहे.  गाण्यातल्या ओळींचा क्रम कायम ठेवायला काही ओळी परत परत लिहीत आहे, व्हिडीओ बघता बघता ओळी वाचल्यास जास्त संदर्भ लागेल - 

ती-
मन बावरे, भोळे खरे,
हळव्या क्षणी उमलुनी खुलते, 
आनंदते, कधी स्पंदते, 
नकळत मग दुसऱ्या मनाशी जुळते...

तो-

मन बावरे, भोळे खरे,
हळव्या क्षणी उमलुनी खुलते, 
आनंदते, कधी स्पंदते, 
नकळत मग दुसऱ्या मनाशी जुळते...

दोघे-

झुरते किती तू नसताना,
कधी तुला का जाणवते,
धागे आपुले जुळले ना परी,
अव्यक्त काही अंतरी उरते...

ती-

मन बावरे, भोळे खरे,
हळव्या क्षणी उमलुनी खुलते, 
आनंदते, कधी स्पंदते, 
नकळत मग दुसऱ्या मनाशी जुळते, 


तो-

का भेटीची, वेळ सरते,
वाळू जशी की निसटते,
तू सोडून जाताना,
आयुष्य माझे थबकते...

दोघे-

प्रेमाचा अर्थ शोधताना,
सोबत मला तू करशील ना,
एक  जन्म  घेऊ या असा,
तेव्हा, 
तुझे माझे नाते परिपूर्ण होऊदे...

तो -

मन बावरे, भोळे खरे,
हळव्या क्षणी उमलुनी खुलते,

ती- 

आनंदते, कधी स्पंदते, 
नकळत मग दुसऱ्या मनाशी जुळते..


गाणं  चालीत चपखलपणे बसतं फक्त थोडा प्रयत्न करावा लागेल.  दुसऱ्या एखाद्या भाषेच्या गाण्याचं मराठीत रुपांतरीत करायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, कसं वाटलं नक्की सांगा....


1 comment:

मन बावरे

तुम्ही "ती सध्या काय करते" हा चित्रपट पाहिला आहे का हो? असेलच आणि आवडला पण असेल. पण तुम्हाला माहिती की अशाच विषयावरचा "96...