Sunday, 4 March 2018

मायभाषा जणू माऊली..



वा! कित्ती छान वाटतंय मराठीतून लिहिताना!अगदी परदेशातून आपल्या देशात आलो की फक्कडसा आयता  चहा मिळाला की कसं  वाटतं तसं वाटतंय. तुम्हाला कितीही भाषा येत असल्या तरी मातृभाषा ती मातृभाषाच. अहो जन्मल्यावर बाळाला प्रथम आईची माया लागते आणि नंतर तिच्या भाषेची.   म्हणून म्हटलं, हा ब्लॉग मराठीतून लिहू या.  त्याला कारण पण तसंच आहे, नुकताच मराठी भाषा दिन साजरा केल्यामुळे त्याचा "हँग ओव्हर" म्हणा हवं तर.


२७ फेब्रुवारी हा प्रत्येक कॉलेजमध्ये..च् च् ... महाविद्यालयात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतात.  या निमित्त मराठी साहित्याची/जपणूक अथवा प्रसार केला जातो आणि ते मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. मी ही आमच्या महाविद्यालयातील मराठी मंडळाचा सभासद असल्यामुळे साहजिकच ही जबाबदारी आमच्यावर असते. तर सांगायचा मुद्दा हा की या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना मला माझ्यातला दडलेला कवी सापडला. अगदी "मै शायर तो नही" गण्यासारखं, फक्त हे प्रेम भाषेवरचं आहे. तर कवी कसा सापडला तर असा....

एक वर्ष आम्ही ठरवलं की आपण थोर कवी मंगेश पाडगावकर यांच्यावर कार्यक्रम करू या. झालं, त्यांच्या कविता, बालगीते, गाणी सगळी तयारी सुरू झाली.  खरं सांगायचं तर मी काही त्यांचे फार कविता संग्रह वाचले नाही आहेत. पण त्यांच्या  खूप कविता,  गाणी माहिती आहेत आणि ऐकली आहेत. दुसरं प्रकर्षाने आठवणारी गोष्ट म्हणजे पहिला पाऊस पडला की न चुकता वर्तमानपत्रात छापून येणारी त्यांची कविता...ती सुद्धा त्यांच्या हस्ताक्षरात. त्यांची कविता सादर करण्याची शैली पण अफलातून होती. जस जसा कार्यक्रमाचा दिवस जवळ येत गेला तस तसं मला वाटू लागलं की ज्या माणसाने आयुष्यभर कवितांवर प्रेम केलं, जगण्यावर प्रेम करायला शिकवलं, त्यांना आपण एक कविताच अर्पण केली तर.  विचार पक्का झाला, पण कशावर लिहायची .., मुलांना उद्देशून लिहू या? पण काहीतरी विनोदी लिहू या आणि टपली मारू या. तर अशा तऱ्हेने सगळं सुचत गेलं आणि कविता लिहून झाली.  अरे हो, सांगतो माझी कविता....
तत्पूर्वी तुम्ही त्यांची मूळ कविता ऐका ज्याच्या वरून मी माझी कविता लिहिली -

https://youtu.be/T9vfn-Etmwo


धम्माल आली ना! आता माझी....शीर्षक आहे -

 "ह्यांचं असं का होतं कळत नाही" 

आजच्या कॉलेजच्या मुलांच जीवन 4G च्या वेगाने धावतंय,
तरी घोडं कुठेतरी अडतंय,
ह्यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही ।

सकाळच्या लेक्चरला नसतात कारण डोकं दुखत असतं,
दुपारच्या प्रॅक्टीकलला नसतात कारण पोट दुखत असतं,
मग परीक्षेचा पेपर लिहिताना कुंथतात, बाहेर काहीच पडत नाही,
ह्यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही ।

कपडे असे घालतात की घरचे सगळे हलतात,
केस असे भादरतात की ओळखीचे हादरतात,
आत्ता समोरून गेलेली व्यक्ती मुलगा होता की मुलगी हेही ओळखत नाही,
ह्यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही ।

नको त्या वयात प्रेमाचे झटके येतात कुणी  डेटला जातात कुणी प्रोपोझ मारतात,
कमिटमेंटचं स्पेलिंग सुद्धा चुकतं मग एफवाय चं सनम टिवाय पर्यंतही टिकत नाही,
ह्यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही ।

 आवाजापलीकडचं संगीत आणि धिंगाण्यापेक्षा वेगळा नाच यांना पचत नाही,
डॉल्बीआणि डीजे शिवाय तर ह्यांचं चालतच नाही,
शतदा प्रेम करावेतला आनंद चार बॉटल व्होडका च्या नशेपेक्षा किती श्रेष्ठ आहे हे यांना उमगतच नाही,
ह्यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही ।

ध्येय, प्रयत्न व सातत्य याशिवाय यश लाभत नाही,
मूल्य जपल्याशिवाय आणि समाधान मानल्याशिवाय शांती लाभत नाही,
मुलांनो, तुमच्या सेल्फीकडे नीट बघा, देवाचा अंश दिसेल,
दिसला तर त्यापेक्षा सुंदर दुसरं काहीच नाही,
ह्यांचं असं का होतं कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही ।
-----

माझ्या इतर सभासदांना ऐकवली तेव्हा ते म्हणाले कार्यक्रमात जरूर वाचा. कार्यक्रमात आम्ही आधी त्यांच्या या मूळ कवितेची चित्रफीत दाखवली आणि माहोल निर्माण झाला. मग मी माझी कविता भीतभीतच वाचली. आणि प्रेक्षकातून टाळ्या पडल्या.  अगदी "वन्स मोर" पण मिळालं, ते ही मुलाकडून!  पण मला मात्र मनोमन माहीत होतं की या टाळ्या खऱ्या मला नव्हत्याच, त्या पाडगावकरांना होत्या ज्यांनी लोकांना भरभरून दिलं आणि हा संदेश दिला -

"या जन्मावर, या  जगण्यावर, शतदा प्रेम करावे... "







2 comments:

मन बावरे

तुम्ही "ती सध्या काय करते" हा चित्रपट पाहिला आहे का हो? असेलच आणि आवडला पण असेल. पण तुम्हाला माहिती की अशाच विषयावरचा "96...